Sunday, 16 April 2023

दुष्काळ ( Drought ) / अवर्षण

 

दुष्काळ ( Drought ) / अवर्षण :





प्रस्तावना 

        एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा काहीशी सापेक्ष आहे. त्याचे वातावरणीय, कृषिविषयक, जलीय  अवर्षण असे प्रकार केले जातात. वातावरणीय अवर्षण म्हणजे दीर्घकाळ पर्जन्यविरहित परिस्थिती, कृषी अवर्षण म्हणजे पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पाण्याची किंवा आर्द्रतेची कमतरता, जलीय अवर्षण म्हणजे भुजल पातळी खाली जाणे किंवा वाहते प्रवाह आटणे.

भारतीय वातावरणविज्ञान विभागाच्या व्याख्येनुसार सामान्य पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असेल तर तीव्र अवर्षण आणि २५ ते ५० टक्के तूट असेल तर मध्यम अवर्षण मानतात. अवर्षण ही जरी नैसर्गिक घटना असली तरी मानवी क्रियाही त्यास जबाबदार ठरतात. ओझोन स्तराचा र्‍हास, जागतिक तापमान वृद्धी, वनांचा र्‍हास, झोत वारा ( वातावरणातील दहापंधरा किमी. उंचीवर वाहणारे विशिष्ट प्रकारचे वेगवान वारे), प्रदूषण, अणु-चाचण्या एल् निनो (पॅसिफिक महासागरातील दक्षिण अमेरिकेच्या किनार्‍याजवळील उष्ण प्रवाह) इ. अवर्षणाची कारणे आहेत.

अवर्षण काळात बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन अधिक असते. हवा कोरडी असते. जलचक्र असंतुलित असते. नद्या, ओढे, सरोवरे, तलाव व विहिरी यांच्यातील जलपातळी कमी असते किंवा हे जलस्त्रोत कोरडे पडतात. पाण्याचे दुर्भिक्ष असते. शेती, उद्योग व वैयक्तिक उपयोगांसाठी पाण्याचा तुटवडा जाणवतो. मृदेतील ओलावा कमी झाल्याने मृदाकण सुटे होऊन तिची धूप वाढते. जीवनावश्यक वस्तुंची टंचाई भासते. दुष्काळी स्थिती निर्माण होते. वनस्पती व प्राणी यांचे जीवन धोक्यात येते. अवर्षणामुळे येणार्‍या रोगराईमुळे मृत्युमान वाढते. औद्योगिक उत्पादन घटते. महागाई व बेकारी वाढते. याचा परिणाम त्या प्रदेशाच्या आर्थिक नियोजनावर होतो. उपजीविकेची साधने घटल्याने लोक स्थलांतर करतात. आर्थिक विषमता आणि सामाजिक व आनुषंगिक समस्या निर्माण होतात.

जगातील सर्वाधिक अवर्षणप्रवण क्षेत्र आफ्रिका खंडात आहे. अल्जीरिया, लिबिया, नामिबिया, उत्तर सुदान, उत्तर केनिया, सहारा व कालाहारी वाळवंट आणि नैऋत्य आफ्रिका ही आफ्रिकेतील अवर्षणप्रवण क्षेत्रे आहेत. याशिवाय अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दक्षिण भाग, रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश, प. मेक्सिको, द. अमेरिकेतील ब्राझीलचा दक्षिण भाग, पेरू, उत्तर चिली, अटाकामा वाळवंट, आशियाचा खंडांतर्गत प्रदेश, सौदी अरेबिया, इराण, इराक, पाकिस्तानचा पूर्व भाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया हे जगातील प्रमुख अवर्षणप्रवण प्रदेश आहेत.

जलसिंचन आयोगानुसार भारतात वार्षिक सरासरी ७५ सेंमी. पेक्षा कमी पावसाचा प्रदेश अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. एकूण पाऊस किती पडला यापेक्षा त्यामधील सातत्य, नियमितता व कालिक वितरण महत्त्वाचे असते. भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. एक तृतीयांश क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. अवर्षणाच्या तीव्रतेनुसार देशातील अवर्षण प्रवण क्षेत्राचे तीन भाग पाडता येतात. त्यांपैकी अत्यंत तीव्र अवर्षण क्षेत्रात राजस्थान व गुजरातमधील कच्छ प्रदेश, तीव्र अवर्षण क्षेत्रात माळव्याचे पठार व पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेचा प्रदेश, तर साधारण अवर्षणप्रवण क्षेत्रात कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांतील काही भागांचा समावेश होतो.

मॉन्सून पर्जन्याची विचलितता, त्याचे आगमन व निर्गमन यांमधील अनिश्चितता आणि पर्जन्याचे असमान वितरण यांमुळे भारतात वारंवार कोणत्या ना कोणत्या भागात अवर्षणाची स्थिती निर्माण होते. भारतातील साधारण ६७ जिल्हे दीर्घकालीन अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. देशातील एकूण अवर्षणप्रवण क्षेत्र सु. ५,२६,००० चौ. किमी. असून त्यापैकी सु. ६० % क्षेत्र राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेशात आहे.

 दुष्काळ ( Drought ) / अवर्षण :

 नैसर्गिकरित्या हवामानात बदल होवून तापमानात वाढ व पर्जन्यात घट झाल्याने दुष्काळ / अवर्षण ही आपत्ती उद्भवते . जगातील १/३ क्षेत्रात पाण्याच्या टंचाईमुळे दुष्काळ ही आपत्ती पहावयास मिळते . ही आपत्ती प्राचीन काळापासून वारंवार उद्भवते आहे . एकूण पर्जन्य किती झाले यापेक्षा ते कसे झाले हे महत्वाचे असते . उदा . आशियामध्ये मान्सूनमुळे तीन महिने पाऊस पडतो . तर युरोपमध्ये किमान ८ महिने पाऊस पडतो . कमी कालावधीत भरपूर पाऊस पडला तरी इतर कालावधीत कमी पाऊस झाल्याने अवर्षण सदृष्य परिस्थिती किंवा अवर्षण आपत्ती येते . 


व्याख्या :

 १. एखादया प्रदेशात किंवा देशात जेव्हा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस पडून त्याचा शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम होतो आणि ही स्थिती अधिक तीव्र झाल्यास लोक प्राणास मुकतात . तेव्हा त्यास अवर्षण किंवा दुष्काळ म्हणतात .

 २. ज्या प्रदेशात नेहमीच्या सरासरीपेक्षा ३० टक्के हून कमी वार्षिक पाऊस पडतो . मातीतील ओलावा नष्ट होतो . हवा कोरडी होते व प्रदेशातील सजीवांची , मानव , प्राणी यांची पाण्याची गरज भागत नाही . पिके , वनस्पतींच्या वाढीला अडथळा निर्माण होतो . पिके , वनस्पती सुकून जातात . नदया , झरे , विहीरी पूर्णपणे आटतात . प्रदेश ओसाड बनतो . अशा परिस्थितीला अवर्षण म्हणतात .

 भारतीय कृषी आयोगाने अवर्षणाचे तीन प्रकार पाडले आहेत :

 १. वातावरणीय अवर्षण : हवामानामुळे सरासरी पर्जन्यापेक्षा २५ टक्के पेक्षा कमी पर्जन्य झाल्याने येणाऱ्या अवर्षणाला वातावरणीय अवर्षण म्हणतात . 

२. जलीय अवर्षण : वातावरणीय अवर्षण दीर्घ काळ टिकले की पाणी प्रमाण घटत जाते . तळी , सरोवरे , नद्या कोरडया पडू लागतात . भूमिगत पाणीसाठा कमी झाल्याने भूमिगत पाणी पातळी खोल जाते . यास जलीय अवर्षण म्हणतात .

 ३. कृषीविषयक अवर्षण : जमिनीत ओलावा टिकून राहत नाही . पाऊस कमी पडतो , पावसावर अवलंबून असणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान होते पिके पाण्याअभावी जळून जातात . त्यालाच कृषीविषयक अवर्षण म्हणतात .

 अवर्षणाची कारणे : 

अवर्षणाची व्याख्या जगभर भिन्न भिन्न असल्यामुळे अवर्षणाची निश्चित कारणे सांगता येत नसली तरी अवर्षणाचा काही गोष्टींशी निश्चित संबंध आहे . त्यामुळे अवर्षणाची काही कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील . 

१. वृक्षतोड : वनस्पती हवेतील बाष्प सामावून घेतात . हवेत आर्द्रता टिकवतात . वनस्पतींची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात . या मुळांच्या सहाय्याने वनस्पती या पडलेल्या पावसाचे पाणी मुळाजवळ धरून ठेवतात . वनस्पतींचे अच्छादन नसलेल्या प्रदेशात भूमिगत जलरेषेची पातळी खाली गेली आहे . जमीन उघडी पडते . बाष्पीभवनाने जमीन कोरडी होते . पाण्याचा तुटवडा भासतो परिणामी दुष्काळ पडतो .

 २. अणुचाचण्यांचे स्पोट : अणुचाचण्यांचे स्पोट हे वाळवंटात , ध्रुवीय भागात , सागरी भागात केले जातात . अशा चाचण्यांमुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी होते . तसेच , अभिसरण प्रवाहावर , पर्जन्यवार , हवेतील आर्द्रतेवर याचा विपरीत परिणाम होतो . त्यामुळे अवर्षण निर्माण होते .

 ३. ओझोनचा क्षय : भूपृष्ठापासून सुमारे ४० किमी उंचीवर स्थितांबर या थरात ओझोन वायूचा थर आहे . हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे वातावरणातील या वायूचे प्रमाण कमी होवू लागले आहे . या संरक्षक थरास छिद्रे पडून अतिनिल किरण भूपृष्ठावर पोहचून पृथ्वीचे तापमान वाढत आहे . त्यामुळे अभिसरन प्रवाहात अडथळे निर्माण होतात . परिणामी दुष्काळ पडतो . 

४. मोसमी वाऱ्यांची अनिश्चितता व अनियमितपणा :

मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस हा हवामानाच्या बदलामुळे अनिश्चित व अनियमित स्वरुपाचा आहे . मोसमी वारे कधी लवकर सुरु होतात . लवकर संपतात , तर कधी उशीरा सुरु होतात . उशिरा संपतात , कधी जास्त पाऊस देतात , तर कधी कमी पाऊस देतात . जेव्हा प्रमाणापेक्षा अतिशय कमी पाऊस देतात . तेव्हा अवर्षण उद्भवते .

 ५. जेट प्रवाह : पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धात ३० उत्तर व ३० दक्षिण अक्षवृत्तावरील उंच थरात पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या हवेच्या प्रवाहास जेट प्रवाह असे म्हणतात . ऋतुनुसार हे प्रवाह वर खाली सरकतात . या वाऱ्याचा परिणाम पाऊस घेवून जाणाऱ्या हवेच्या प्रवाहावर पडतो . वादळांची निर्मिती होते . मूळ प्रदेशापासून हे पर्जन्ययुक्त आवर्त वारे दुसरीकडे जातात तेव्हा मुळ प्रदेशावर दुष्काळ पडतो .

 ६. इतर कारणे : वरील कारणाशिवाय गवताळ प्रदेशाचा अयोग्य वापर , भूमिगत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर , नद्या , तळी व सरोवरात गाळ साचून त्यांची पाणी साठविण्याची क्षमता कमी होणे इत्यादी कारणांमुळे अवर्षण निर्माण होते . 

अवर्षणाचे परिणाम : 

   अवर्षण ही नैसर्गिक आपत्ती आहे . अवर्षणाचा पाणी व अन्न या मुलभूत गरजांशी संबंध असल्याने यामध्ये पर्यावरणिय , आर्थिक , लोकसंख्या आणि राजकीय दृष्टया परिणाम होतात . ते परिणाम पुढील प्रमाणे होतात .

 १. अवर्षणामुळे पाण्याचे प्रमाण घटते .

 २. अवर्षणाने जलचक्राचे संतुलन बिघडते .

 ३. अवर्षणाने भूमिगत पाण्याची पातळी खाली जाते . 

४. विहीरी , तळी , सरोवरे , नद्या इ . मधील जलाशयांचे पाणी कमी होते . झरे आटतात , नदीची पात्रे कोरडी पडतात 

 ५. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते . 

६. अवर्षणामुळे पिके वाळून जाऊन अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होतो .

 ७. अवर्षणाचा शेतीवर गंभीर परिणाम होतो . 

८. अवर्षणामुळे कुपोषण , भूकबळी , अर्धपोषण यासारख्या समस्या निर्माण होतात .

 ९ . अवर्षणाने प्राणी व वनस्पतीच्या काही विशिष्ट जाती नष्ट होतात .

 १०. अवर्षणाचा उद्योगधंदयांवरही परिणाम होतो .

 ११. अवर्षणाने जमिनी कोरडया पडून जमिनीची धूप होते .

 १२. अन्न , पाण्याची स्थिती गंभीर बनल्यास अवर्षणामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात . उदा . १ ९३३- ३७ च्या दुष्काळात चीन मध्ये ५० लक्ष लोक १ ९७६-७७ च्या दुष्काळात भारतामध्ये ४० लक्ष लोक , तर १ ९६८- ७५ च्या दुष्काळात भारतामध्ये ४० लक्ष लोक तर १ ९६८-७५ च्या दुष्काळात इथोपियात ५० हजारापेक्षा अधिक लोक मरण पावले ] 

१३. अवर्षण क्षेत्राकडून लोकसंख्या व जनावरांचे दुसरीकडे स्थलांतर होवून प्रादेशिक संतुलन बिघडते . 

१४. अवर्षणाचा परिसंस्थांवर परिणाम होतो .

 अवर्षण समस्येवर उपाय : 

जगात वेगवेगळया संघटना अवर्षणावर उपाय शोधण्याचे कार्य व अवर्षणग्रस्त लोकांना अन्नधान्ये , आरोग्य सुविधा , पाणीपुरवठा , आर्थिक मदत करण्याचे कार्य करतात . खालील प्रकारच्या काही उपाययोजना राबविल्यास अवर्षणावर थोडी फार मात करता येईल . 

१. हवामानाचा सुक्ष्म अभ्यास केल्यास यावर पर्जन्याबाबतची काही माहिती उपलब्ध होवू शकते . त्यामुळे अवर्षणासंबंधी माहिती आगोदर मिळू शकेल . 

२. जमिनीवर वन क्षेत्रात वाढ करणे . 

३. पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे . 

४. कमी पाण्यावर धान्याचे उत्पादन घेणे . 

५. पाण्याचा अपव्यय टाळणे .

 ६. मिश्र पिकांबरोबर मिश्र वनस्पतींची लागवड करणे . 

७. धरण प्रकल्पांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला कालव्यांद्वारे पुरविणे . 

८. पावसाचे पाणी सुरक्षित साठवून ठेवणे .

 ९ . भूपृष्ठावर गवत , वनस्पतींचे अच्छादन करणे . 

१०. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे . 

११. शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करणे . 

१२. अवर्षणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे .


No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...