Monday, 24 April 2023

Introduction to Physical Geography प्राकृतिक भूगोलची ओळख

    प्राकृतिक भूगोलची ओळख



 प्रस्तावना:-  

                प्राचीन काळापासून भूगोल या विषयाचा व्यासंग मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. Geography या शब्दाचा अर्थ  Geo म्हणजे पृथ्वी व graphy म्हणजे वर्णन करणे.पृथ्वीचे वर्णन होय नद्या पर्वत, पठार ,मैदान, हवामान ,वनस्पती व पिके मानवी जीवन असे एखाद्या प्रदेशातील वर्णन म्हणजे भूगोल. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम कोणत्याही गोष्टींचे निरीक्षण करणे वर्णन करणे त्याचे परीक्षण करून वर्गीकरण करणे आणि शेवटी संशोधन करणे .या अवस्थांतून जावे लागते त्याचप्रमाणे भूगोल शास्त्राचा ही विकास झाला .आहे प्राचीन काळापासून ग्रीस, रोमन, ख्रिस्ती, भारतीय भूगोल तज्ञांनी भूगोलाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. एक स्वतंत्र शास्त्र म्हणून भूगोलाचे अध्ययन अठराव्या शतकापासून सुरुवात झाले तर एकूणच या शतकात आंतरसंबंधाचे   शास्त्र म्हणून ओळखले जाते. शास्त्र म्हणून जर्मनी, फ्रान्स या देशात भूगोलाचा विकास घडून आला. आता विसाव्या शतकात भूगोलाचे स्वरूप पूर्णपणे बदलले दिसून येते आणि एक महत्त्वाचा विषय म्हणून ओळखला जातो.भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. सध्याच्या काळात भूगोलाचा इतका अभ्यास व्यापक झालेला आहे की, या विषयाच्या अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत. भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा निर्माण झालेले असून प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा भूगोलाच्या दोन शाखा आहेत.

                   अभिक्षेत्रीय भिन्नते नुसार स्थळ-काळ सापेक्ष बदलणाऱ्या घटक व घटनांचा अभ्यास म्हणजे भूगोल होय. पृथ्वीवरील भूमी स्वरूपे, भूपृष्ट रचना, हवामान, वातावरण ,सागर प्राणी, वनस्पती यांचा यामध्ये अभ्यास केला जातो. .,शिलावरण,जलावरण, वातावरण ,जीवावरण हे चारही घटक प्राकृतिक भूगोलाच्या  अंतर्गत आहेत .या सर्व घटकाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. यातूनच भूगोलाच्या अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्यातलीच एक प्रमुख शाखा म्हणून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. त्यांच्या व्याख्या खालीलप्रमाणे.

 प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या :-

 निरनिराळ्या भूगोल शास्त्रज्ञांनी प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत

  1.  आर्थर होम्स:- प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास हाच प्राकृतिक भूगोल असून त्यामध्ये भूरूपशास्त्र सागरशास्त्र,वातावरण ,जैविकशास्त्र व हवामान शास्त्राचा अभ्यास समाविष्ट होतो.

  2. स्ट्लर:- प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठावरील भौगोलिक घटकांचा विविधतेचा अभ्यास होय.

  3.  डब्ल्यू .जी. मूर:- पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारी अशी शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल ज्यामध्ये शिलावरण आणि हवेच्या अभ्यास प्रामुख्याने समावेश होतो .या शास्त्रांमध्ये सागरशास्त्र ,हवामान शास्त्र ,भूरूपशास्त्र याप्रमाणे मृदा, वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो.

  4.   थोडक्यात सृष्टीतील भौतिक, निर्जीव घटक व तत्त्वे आणि सजीव घटकांची प्रक्रिया यांच्यातील परस्पर संबंधांचे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय.

भूष्ठावरील भौगोलिक घटकांच्या विविधतेचा अभ्यास तसेच या विविध प्रकाराचा इतर बाबींवर वितरणावर जो प्रभाव पडतो त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय.

 प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप:-  प्राकृतिक भूविज्ञान या शाखेचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक व्यापक बनत चालले आहे. या शाखेत पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा   मानवांच्या प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास समाविष्ट असतो. प्राकृतिक भूगोलात खडक, विविध भूमी स्वरूपे, बाह्य स्वरूपे , जमीन पाणी यांची विभागणी पृथ्वीला सर्व बाजूंनी वेढून टाकणारे हवेचे आवरण या आवरणशिवाय पृथ्वीवरील जीवसृष्टी जगू शकत नाही. तसेच वातावरणात घडून येणाऱ्या प्राकृतिक घडामोडी, मातीचा पातळ थर, त्यावर वाढणारे  वनस्पतीचे आवरण प्राणी यांचा एकत्रित परिणाम म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. प्राकृतिक भूविज्ञान या शाखेत पृथ्वीवरील मृदावरण,जलावरण ,वातावरण जीवावरण यांचा अभ्यास केला जातो .या चार आवरणामध्ये सतत अंतर्गत क्रिया घडत असून त्यातूनच वेगवेगळ्या परिसंस्थाचे निर्मिती झाली आहे.या परिसंस्थातील घटकांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास अभ्यास केला जात असल्याने त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वात प्रथम पृथ्वीची उत्पत्ती, तिचा आकार, मोजमापे, सौर माला यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूगोलात सर्वप्रथम प्रयत्न झाला.गणिती खगोल शास्त्रीय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. पृथ्वीवरील जमीन जलाशय, खंड महासागराची निर्मिती, भूमी स्वरूपे त्यांची निर्मिती यांची कारणमीमांसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला.

       प्राकृतिक भूगोलात कार्यकारण भाव  स्वरूपाचा अभ्यास केला जातो. एखादी घटना कधी? कोठे ?कसे घडली जाते? याविषयी शास्त्रीय आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच प्राकृतिक घटकांची स्थलीय भिन्नता अभ्यासली जाते. स्थलीय भिन्नतेमुळेच पृथ्वीवरील सांस्कृतिक भिन्नता निर्माण झाली आहे .त्यामुळे सांस्कृतिक पर्यावरणाच्या भिन्नतेचा पाया म्हणून या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो.

         प्राकृतिक भूगोलात अभ्यासल्या जाणाऱ्या घटकात स्थळानुसार वेगळेपण आढळते. तसेच काळानुसार सुद्धा भिन्नता निर्माण झालेली आहे .या घटकात वारंवार बदल होत आहेत. हे बदल काही वेळा कायमस्वरूपी तर काही वेळा तात्पुरते असतात तसेच बदल शीघ्र किंवा मंद गतीने घडून येतात अशा बदलांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो.उदाहरणार्थ 40 दशलक्ष वर्षापूर्वी काही भूगर्भीय हालचालींमुळे तेथील समुद्राचा तळ भाग उंचावून हिमालय पर्वताची निर्मिती झाली .या बदलाचा अभ्यास या विषयात केला जातो.म्हणून असे सर्व बदल गतिमान व प्रगत प्रगमनशील आहेत. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप सुद्धा गतिमान आहे. तसेच प्राकृतिक भूगोलात अभ्यासला जाणाऱ्या अनेक गोष्टी भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र इत्यादी शास्त्राशी संबंधित आहेत. म्हणून इतर शास्त्राचा अभ्यास करताना आधार घ्यावा लागतो. म्हणून या विषयाचे स्वरूप आंतरविद्याशाखीय झालेले आहे.

 प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती:- प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा पायाभूत मूलभूत स्वरुपाचा असल्याने प्राकृतिक भूगोल शिवाय भूगोलाच्या अध्ययन अशक्य आहे .पृथ्वीचे पर्यावरण प्राकृतिक निसर्गतः बदल दर्शवितो या बदलाचे परिणाम जीवसृष्टीवर तसेच मानवी कार्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. प्राकृतिक घटक व मानव यांचा जवळचा संबंध आहे .प्राकृतिक भूगोलात मृदावरण, वातावरण ,जलावरण, जीवावरण या उप घटकांचा अभ्यास केला जातो.

  1. मृदावरण:- प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वृदावन शिलावरण होय यामध्ये पृथ्वी अंतरंग ,खडक त्याचे प्रकार व निर्मिती विदारण, महासागर ,खंडे, पर्वत पठाराची निर्मिती ,भूरूपे ज्वालामुखी या अंतर्गत शक्ती बरोबरच नदी, हीमनदी, वारा, सागरी लाटा, बहिर्गत शक्तीमुळे निर्माण होणाऱ्या भविष्य यांची माहिती अंतर्भूत असते.

  2.  वातावरण:- पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. वातावरणाचा अभ्यास हवा व हवामान ,वातावरणाची घटना, रचना, वातावरणीय आपत्ती आदींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. वातावरणात घडणाऱ्या प्रक्रियांचे परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होतात. त्यामुळे प्राकृतिक भूगोलात वातावरणाचा अभ्यासला जास्त महत्त्व आहे.

  3. जलावरण:-  पृथ्वीचा पृष्ठभाग भूमी पेक्षा जलाने जास्त प्रमाणात व्यापला आहे म्हणुनच पृथ्वीला जलग्रह म्हणतात. जलावरण आणि पृथ्वीचा 71 टक्के भाग व्यापला आहे. महासागराच्या तळाची रचना, सागर जलाचे गुणधर्म, सागर जलाची क्षारता, सागरी प्रवाह, सागर जलाचे तापमान इत्यादी गोष्टींचा जलावरणात अभ्यास केला जातो.

  4. जीवावरण:-  मृदावरण, वातावरण ,जलावरण यांना व्यापून टाकणारे आवरण म्हणजे जीवावरण होय .यामध्ये वनस्पती प्राणी यांचा अभ्यास केला जातो सजीवांना अनुकूल आवरण म्हणजे जीवावर होय पृथ्वीवरील जैविक व अजैविक घटकांचा एकमेकावर जो परिणाम होतो त्याचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो.

वरील सर्व घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो म्हणून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती मोठी आहे

 


प्राकृतिक भूगोलाच्या शाखा:-



  1. ज्योतिर्विज्ञान भूगोल:- आपले विश्व, सूर्यमाला, ग्रहांची व उपग्रहांची निर्मिती पृथ्वी व इतर ग्रह, त्यांचे उपग्रह, त्यांच्या गती, कालमापन ,भरती -ओहोटी, दिवस-रात्र निर्मिती, ऋतुचक्र यांचे अध्ययन ज्योतिर्विज्ञान भूगोलात केले जाते.

  2. भूरूपशास्त्र:- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील  भुउठावांचे अर्थशोधक वर्णन म्हणजे भूरूपशास्त्र होय. यामध्ये हे सर्व भूरूपीय क्रियांचा अभ्यास केला जातो खंड व महासागर, पर्वत निर्मिती, भूकंप, ज्वालामुखी, नदी, हिमनदी, वारा, भूमिगत पाणी, सागरी लाटा या बाह्य कारकामुळे निर्माण होणाऱ्या सर्व भूरूपाचा अभ्यास  भूरूप शास्त्रांमध्ये केला जातो. तसेच भूकंपाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.

  3.  हवामान शास्त्र:- हवामान शास्त्र हे पृथ्वीवरील विविध प्रकारचे हवामान त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करणारे शास्त्र होय यामध्ये पृथ्वीवरील वातावरणाचे थर, सौरशक्ती ,तापमान, वायुभार, वारे ,आर्द्रता, मेघ, वृष्टीचे प्रकार, पर्जन्यमान इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच या सर्व घटकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम व मानवाचे समायोजन या घटकाचा अभ्यास केला जातो.

  4. सागर शास्त्र :- सागर शास्त्राच्या अंतर्गत सागरतळाची रचना व स्वरूप विशेषतः सागरीजल आणि त्याच्या हालचाली चा अभ्यास केला जातो. सागरा विषयी शास्त्रीय माहिती सागरशास्त्रात अभ्यासली जाते. सागरतळाची रचना, स्वरूप, सागर जलाचे गुणधर्म, त्याच्या हालचाली, सागरी प्रवाह, सागरातील खनिजे इत्यादी गोष्टीचा अभ्यास सागर शास्त्रात केला जातो.

  5.  मृदा भूगोल:-  मृदेवर परिणाम करणारे घटक, मृदा निर्मिती, त्यात आढळणारी क्षेत्रीय, भिन्नता वैशिष्ट्ये, रचना, निर्मिती, वर्गीकरण, यांचा अभ्यास मृदा भूगोलात केला जातो.

  6. जैविक भूगोल:-  जैविक भूगोलात वनस्पती व प्राण्यांचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये पर्यावरणाचे सर्व प्राकृतिक घटक समाविष्ट होतात. जे विविध जैवजाती आणि जीवांचे अधिवास असतात .जैविक भूगोलात प्राणी आणि त्यांचे प्रकार त्यांचे वितरण वितरणावर परिणाम करणारे घटक, परिसंस्था व परिस्थितीकी तसेच मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम या सर्व घटकांचा अभ्यास जैविक भूगोलामध्ये केला जातो.

  7. पर्यावरण भूगोल:-    प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा म्हणून पर्यावरण भूगोलाकडे पाहिले जाते. पर्यावरण भूगोलामध्ये हे पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो ज्यामध्ये पर्यावरण प्रदूषण, परिसंस्था, मानव पर्यावरणीय घटक यांचा सहसंबंध, सहसंबंधातून तयार होणाऱ्या अनेक घटना व घडामोडी चा अभ्यासयातून केला जातो. आज पर्यावरणामध्ये होणारे बदल यामध्ये अभ्यासले जातात. ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन अवक्षय, तसेच अनेक प्रकारचे प्रदूषण व त्यावरील उपाय इत्यादी घटकांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रातून केला जातो.

प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व:-

  1. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचे सर्वसाधारण साधारण ज्ञान आवश्यक असून त्याशिवाय भूगोलातील विविध संकल्पना समजणे अवघड आहे.

  2.  निसर्गातील विविध घडामोडी वैज्ञानिक व नैसर्गिक नियमानुसार घडतात यावरच प्राकृतिक भूगोल आधारलेला आहे. म्हणून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

  3.  नैसर्गिक विज्ञान शाखांमध्ये आधुनिक युगात भूगोल शास्त्राचे स्थान अनन्यसाधारण आहे. या विषयाच्या प्राकृतिक भूगोल शास्त्र आणि मानवी भूगोल शास्त्र या दोन प्रमुख शाखा असून कालानुरुप गरजेनुसार विविध शाखा निर्माण झालेल्या आहेत. याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त झाले आहे.

  4.   प्राकृतिक भूगोलात भौगोलिक घटकांचे वितरण क्षेत्रीय भिन्नता विविधतेतील एकता कार्यकारणभाव सहसंबंध इत्यादी तत्त्वांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला जातो.

  5.  पृथ्वीवरील मृदावरण ,वातावरण व जलावरण यांचा जीवावर ना वर होणारा परिणाम व प्रभाव अभ्यासला जातो.

  6.  प्राकृतिक भूगोलात पृथ्वीची उत्पत्ती, तिचा आकार ,विस्तार, अंतर्गत रचना, खडक, खनिजे, विविध भूमी स्वरूपे त्याची निर्मिती या सर्व घटकांचा मानवी जीवनात वर पडणारा प्रभाव आपण अभ्यासतो.

  7.  प्राकृतिक भूगोल अंतर्गत खडक प्रकारावर खनिज संपत्तीचे वितरण भूमिगत जलसाठे ,मृदा प्रकार, भूपृष्ठाची झीज तसेच भूरूपे ,भूकंप ,ज्वालामुखी यासारख्या विनाशकारी हालचालीचा अभ्यास प्राकृतिक भूगोलतून केला जातो.

  8.  प्राकृतिक भूगोलात हवामानाचा अभ्यास केला जातो कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे हवामान का निर्माण झालेले आहे या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो .म्हणून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण आहे.

  9.  थोडक्यात प्राकृतिक भूगोलाचे विद्यार्थ्यांना प्राथमिक ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी निसर्गातील नियम परस्पर संबंध घडामोडी यांचा विचार करताना प्राकृतिक भूगोल या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मानव व निसर्ग यांच्यातील संबंधाचे सखोल ज्ञान आपल्याला मिळते. मानवी भूगोलाची पार्श्‍वभूमी या दृष्टीने प्राकृतिक भूगोलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.


No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...